मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला यंदा ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. अखेर या निर्णयामुळे शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद मिटला आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपशी हातमिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. तोच प्रकार याही वर्षी कायम आहे. मात्र दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला. पुढे या वादातून शिंदे गटाने माघार घेत मेळाव्यासाठी अन्य मैदान निश्चित केले. त्यामुळे हा वाद आपोआप संपुष्टात आला. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.V