मुंबई: गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरुप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. बीड आणि धाराशीव जिल्ह्यात हिंसक आंदोलनामुळे झालेली परिस्थिती निवळत असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आंदोलकांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी येथील आमदार निवासाच्या बाहेर उभी असलेली मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तीन तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या. आमदार निवासाचा परिसर हा मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता या परिसरातही मराठा आंदोलनाचा भडका उडू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणारे तिघेही छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे आहेत. या तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानपुरे अशी आहेत. या तिघांना मरिनड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर कागलमध्येही हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर संबंधित आंदोलकांच्या सुटकेसाठी मराठा संघटनांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात वकील पाठवण्यात आले होते.
मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. मंत्रालयाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आमदार निवास आहे. या आमदार निवासच्या खाली मंत्री हसन मुश्रीफांची गाडी उभी होती. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे.
भुजबळांवर रोष
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध दालनांत लावलेल्या भुजबळ यांच्या प्रतिमा काढून घेतल्या. या प्रतिमा बाजार समितीच्या बाहेर आणून त्यांची तोडफोडही केली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करीत २५ ते ३० जणांचा जमाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात घुसला. बाजार समितीवर छगन भुजबळ यांच्या गटाची सत्ता असल्याने सभापती व इतर दालनांत भुजबळ यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. जमावाने जोरदार घोषणाबाजी करीत या प्रतिमा भिंतीवरून हटविल्या. दरम्यान, येवला येथील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.
आमदार हिरेंच्या कार्यालयाला ठोकले टाळे
सिडको : सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्या सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोकले. ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत ‘आमदार सीमाताई हिरे राजीनामा द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या.