पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केलीय. हमासने आज शनिवार पहाटेपासून इस्त्रायलच्या 7 शहरांवर रॉकेट हल्ले सुरू केले असून यात अनेक लोक ठार झाले आहेत.
हमास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आपातकालिन मंत्रिमंडळ बैठकीनंतर नेतन्याहू म्हणाले की, इस्रायलच्या नागरिकांनो, हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच जिंकू. याची किंमत शत्रूंना चुकवावी लागेल. हमासच्या हल्ल्यात अनेक लोक मारले गेल्याची बातमी आली आहे. सुमारे 300 लोक जखमी झाले आहेत. हमासचे दहशतवादी आपल्या देशात घुसले आहेत. इस्रायलच्या पश्चिमेकडील शहरांमध्ये सातत्याने रॉकेट हल्ले सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हमासने इस्त्रायलची राजधानी तेल अवीव, सडेरोट, अश्कलोनसह 7 शहरांवर आज, शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रॉकेट हल्ले सुरू केले.
हे रॉकेट रहिवासी इमारतींवर पडले आहेत. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून इस्रायलविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. येथे इस्त्रायली लष्कराने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड’ सुरू केले आहे. लष्कर हमासच्या ठाण्यांवर हल्ले करत आहे. यापूर्वी लष्कराने युद्धासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. सैन्याने आपल्या सैनिकांसाठी ‘रेडिनेस फॉर वॉर’चा इशारा दिला होता.
दरम्यान आपण इस्रायलवर 5 हजारांहून अधिक रॉकेट हल्ले केले असल्याचे हमासने सांगितले आहे. एवढेच नाही, तर आपण इस्रायली कब्जाच्या विरोधात “ऑपरेशन अल-अक्सा फ्लड” सुरू केले आहे, अशी घोषणाही हमासने केली आहे. यानंतर, आपणही युद्धासाठी तयार आहोत, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. लष्कराने आपल्या सैन्यासाठी ‘रेडिनेस फॉर वॉर’चा अलर्टदेखील जारी केला आहे. तसेच, गजामध्ये शिक्षण मंत्रालयाने आज सर्व शाळांना सुट्टी दिली आहे.