ऊस दर आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह अडीज हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष आणि तब्बल अडीच हजार अज्ञातावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महामार्ग अडवून धरला
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच ऊस आंदोलन काल राजू शेट्टी यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलनाची तीव्रता वाढवली. चार बैठका निष्कर ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानुसार काल राजू शेट्टी यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सकाळी ११ च्या सुमारास अडवला यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर शहरातील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन रात्री ८च्या सुमारास निर्णय आल्यानंतर तब्बल ९ तासांनी संपल. दरम्यान या नऊ तासात प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. तर आता या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
ठाणे अंमलदार कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून जिल्ह्यात पाच किंवा पाचहून अधिक लोक एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास सभा घेण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) आणि ३७(३) अन्वये जिल्ह्यामध्ये बंदी आदेश असताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आला या प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, अरुण माळी, राहूल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शरद पाटील, बंडू पाटील, सागर मादनाईक, अजित पोवार, शाहरुख पेंढारी, अनिल चव्हाण यांचेसह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















