महाराष्ट्रातील बहुचर्चित केबीसी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असून त्यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाऊसाहेब चव्हाण यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड येथील प्रत्येकी १ व परभणी येथील १२ प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे..
नाशिक पोलीस २०१६ मध्ये केबीसी घोटाळयाचा तपास करत असताना मुंबई विमानतळावरून या घोटाळ्याचे सूत्रधार चव्हाण पती-पत्नीला अटक करण्यात आलेली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक पोलिसांना तपासाचे आदेश दिलेले होते. यानुसार सिंगापूरहून भारतात येत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्यांचा तपास सुरु झाला. त्यांच्याविरुद्ध नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, हिंगोली येथे प्रत्येकी एक व परभणी येथे १४ तसेच राजस्थान मध्येही दोन अश्या एकूण २३ केसेस दाखल झाल्या त्यानंतर त्यांनी वेळोवेळी जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार २०१८ मध्येच नाशिकच्या गुन्ह्यासाठी त्यांना जामीन मंजूर झाला. तर नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्यांच्या प्रलंबित १५ केसेसमध्ये जामीन मंजूर केल्याने त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना असे म्हटले आहे कि, सर्व प्रकरणांमधील तपास पूर्ण झालेला असून चार्जशीट दाखल झालेली आहेत. आरोपीने कारागृहात साडे सहा वर्षांचा कालावधी काढलेला आहे त्यामुळे आरोपीस खूप जास्त वेळ कारागृहात ठेवणे उचित दिसत नाही. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात येत आहे. भाऊसाहेब चव्हाण यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात ऍड. सिद्धार्थ दवे, ऍड्. सिद्धार्थ गोस्वामी आणि ऍड्. संतोषकुमार पाण्डेय यांनी युक्तीवाद केला.
नाशिक केंद्र असलेल्या केबीसी कंपनीविरोधात जुलै २०१४ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. नाशिकमध्ये सात हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदविली असून तकार रकम २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तसेच, पोलिसांनी १३० कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त केलेली आहे. जम मालमत्ता हि ४.६६ कोटी रोख रक्कम २५ कोटी बँकेतील शिल्लक रकम ९ किलो सोने पर, जामीन व इतर मालमत्ता अश्या स्वरूपाची आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे कंपनीची सर्व मालमता ही नाशिक जिल्ह्यातच आहे.