वृद्धाला गुप्तधनातून कोट्यधीश होण्याचे स्वप्न दाखवून स्वतः लखपती होण्याची इच्छा बाळगणा-या मांत्रिकासह दोघांवर देवरी पोलिसांनी अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ८० वर्षांच्या वृद्धाला गुप्तधनातून कोट्यधीश होशील, असे आमिष देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल ७ लाख रुपये उकळले. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या खुर्शीपार येथे घडली. खुर्शीपार येथील ग्यानिराम उके (८०) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने गुडघ्याचा त्रास नष्ट होणारी औषधी कुठे मिळेल, असे नातेवाइकांना विचारले असता, नातेवाइकांनी या मांत्रिकाचा नंबर दिला. नातेवाइकांच्या माध्यमातून त्या मांत्रिकासोबत त्यांची चांगली ओळख झाली. त्याच्याकडून ग्यानिराम उके यांनी गुडघेदुखीची औषधी घेतली. त्यात त्यांना आरामही झाला. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपी गोपाल वैद्य (५५, रा. पारडीसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर) याने आपले व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांना दिले होते. औषधी घेण्यासाठी गेलेल्या ज्ञानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे, ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो, असे त्याने सांगत तू कोट्यधीश होशील, असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास – ठेवत खुर्शीपार येथील ग्यानिराम उके यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली.
आरोपींनी त्यांच्याजवळून ७ लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात देवरी पोलिसांनी दोन आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.