ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढविल्या जात नसल्या, तरी सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आपापले पॅनेल उतरवित असतात. यात, अनेकदा निवडणुकीनंतर इतर पक्ष विजयी उमेदवार हा आपल्याच पक्षाचा असल्याचे सांगत पळवापळवी करीत असल्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे अशी ही पळवापळवी टाळण्यासाठी भाजपने पक्ष समर्थित उमेदवारांकडून ते पक्षाचा उमेदवार असल्याचे शपथपत्रच लिहून घेतले आहे. भाजपची ही शक्कल सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्ह्यात होऊ घातलेल्या बहुप्रतीक्षित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीची अर्जछाननी व अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असून ३६१ सरपंचपदांसाठी १ हजार १८६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच २ हजार ९९९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ६ हजार ८८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसल्या तरी अनेक राजकीय पक्ष आपापले पॅनेल उभी करतात. परंतु, निवडणुकांनंतर अनेकदा इतर पक्ष विजयी उमेदवारांची पळवापळवी करतात. ती टाळण्यासाठी भाजपने यंदा पक्ष समर्थित उमेदवारांकडून शपथपत्र भरून घेतले आहे.
याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले, ‘आम्ही भाजप समर्थित उमेदवारांची माहिती एका अर्जावर लिहून घेतली. या अर्जावर उमेदवाराचा फोटो, पत्ता व इतर माहिती आहे. ‘मी भाजप समर्थित पॅनलकडून ही निवडणूक लढवित आहे’, असे या अर्जावर नमूद असून त्यावर संबंधित उमेदवाराची सही घेण्यात आली आहे.’ त्यामुळे एकप्रकारे भाजपने आपल्या उमेदवारांकडून शपथपत्रच भरून घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसचे २७५; तर भाजपचे ३०० जागांचे लक्ष्य
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक म्हणाले, ‘सध्या ग्रामीण भागात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या त्यांच्या भागांतील जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३६१ पैकी २५० ग्रामपंचायतींमध्ये आमची सत्ता आहेच. यंदा आम्ही सरपंचपदाच्या २७५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे.’ तर, भाजपने यंदा सरपंचपदाच्या ३०० जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.
दोन सरपंच अविरोध