छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच या यादीत 3 खासदारांसह 9 महिलांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने मंत्री आणि खासदार रेणुका सिंह यांना भरतपूर सोहनतमधून उमेदवारी दिली आहे.
भाजपाने जाहीर केलेल्या यादीत एकूण 64 उमेदवारांचा समावेश आहे. रेणुका सिंह यांच्याशिवाय पक्षाने ज्या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे त्यात गोमती साई आणि अरुण साओ यांचा समावेश आहे. गोमती साई पाथळगावमधून तर अरुण साओ लोर्मी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पुन्हा एकदा जुन्या नेत्यांवर विश्वास व्यक्त केला असून अनेक माजी मंत्र्यांना तिकीटही दिले आहे. यामध्ये माजी मंत्री ननकीराम कंवर रामपूरमधून, धरमलाल कौशिक बिल्हामधून, अमर अग्रवाल बिलासपूरमधून, राजेश मुनत हे रायपूर नगर पश्चिममधून, ब्रिजमोहन अग्रवाल हे रायपूर नगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह पुन्हा एकदा राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत. राजनांदगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रमणसिंग गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर विजयी होत आहेत.