जम्मू-काश्मिरात अनियंत्रित बस 300 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झालाय. तर उर्वरित जखमी प्रवाशांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. राज्यातील डोडा जिल्ह्यात आज, बुधवारी हा अपघात घडला.
जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यातील आसारमध्ये बसचे नियंत्रण सुटले आणि सुमारे 300 फूट खोल दरीत पडली. हा अपघात इतका भीषण होता की 33 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. बस किश्तवाडहून जम्मूच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनाही कळवण्यात आले. जखमींना उपचारासाठी डोडाच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी) नेण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना जीएमसी जम्मू येथे पाठवले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या मार्गावर 3 बस एकत्र धावत असून एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या शर्यतीत हा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा उपायुक्त, एसएसपी डोडा आणि इतर अनेक अधिकारी जीएमसी डोडा येथे पोहोचले आहेत. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.