मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले श्री. विकास गजरे हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर दि. १ जून २०२३ पासून कार्यरत आहेत. श्री. विकास गजरे यांनी नुकताच कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष Triathlon या स्पर्धेत “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” बनण्याचा पराक्रम केला होता. आता त्यांनी गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या जागतिक पातळीवरील स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करीत स्वत:ला पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द केले आहे.
या यशाबददल त्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, इतर सहकारी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, महसूल तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
यापूर्वी कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित “लोहपुरूष Triathlon” या स्पर्धेत श्री. गजरे यांनी कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे, अशा तीन टप्प्यात असलेली स्पर्धा ८ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण करुन “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” चा किताब पटकाविला होता.
गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 देशातील विविध ठिकाणाहून एकूण 787 स्पर्धक सहभागी झाले हाते. जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत समुद्रात 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालविणे आणि 21.1 किमी धावणे या बाबींचा समावेश होता. स्पर्धकांसमोर 112.9 किमी अंतराची ही स्पर्धा 8 तास आणि 30 मिनिटात पूर्ण करण्याचे आव्हान होते. स्पर्धेचा प्रारंभ मिरामार येथे झाला होता. यापैकी 517 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. जवळपास 34% स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करु शकले नाहीत. मात्र अशा या जगातील अत्यंत अवघड असलेली, आव्हानात्मक, शरीर आणि मनाच्या ताकदीची कसोटी पाहणारी “आयर्न मॅन ट्रायथलॉन” स्पर्धा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.विकास गजरे यांनी अवघ्या 8 तास 8 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. श्री. गजरे यांनी या स्पर्धेत वयानुसार असलेल्या गटातून 88 वा तर पुरुष गटातून 468 वा क्रमांक पटकाविला.
यापूर्वी देखील श्री. गजरे यांनी ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण करणे, ही अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन ऑगस्ट २०२२ मध्ये पू्र्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील स्पर्धा पूर्ण केली आणि आता या जागतिक पातळीवरील स्पर्धेचे आव्हान स्विकारले. यासाठी त्यांनी सरावासाठी रोज सकाळी ५-७ या दरम्यानचा किमान २ तास वेळ दिला. यामध्ये त्यांनी सायकल चालविणे, पोहणे व धावणे या तिन्ही खेळांचा सातत्याने सराव केला. यासोबतच खाण्यापिणाच्या सवयींवर बारकाईने लक्ष दिले. लवकर झोपणे लवकर उठणे, हा मंत्र त्यांनी कटाक्षाने प्रत्यक्ष कृतीत आणला.
या यशाबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गजरे यांनी इतरांबरोबरच विशेष करुन शासकीय अधिकाऱ्यांसाठी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचा संदेश दिला असून शासकीय अधिकाऱ्यांनी व्यायामासाठी वेळ जरुर काढावा, असे आवाहन केले आहे.