नवी दिल्ली महापालिकेने मंगळवारी मांस दुकान परवाना धोरणात बदल केलाय. त्यानुसार राजधानीत आता मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि स्मशानभूमीच्या 150 मीटर परिसरात मांस विक्रीची दुकाने उघडता येणार नाहीत.
महापालिकेच्या नवीन धोरणानुसार कोणतेही धार्मिक स्थळ आणि मांसाचे दुकान यामध्ये किमान 150 मीटरचे अंतर असणार आहे. मशीद समिती किंवा इमामाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मशिदीजवळ मांस विकता येईल. मात्र, मशिदीच्या 150 मीटर परिसरात डुकराचे मांस विकण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. पशुवैद्यकीय सेवा विभागाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर नवीन मांस दुकान परवाना धोरण लागू होणार आहे. लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे एमसीडीने म्हटले आहे.
या धोरणात लहान मांस दुकाने, प्रक्रिया युनिट, पॅकेजिंग किंवा स्टोरेज प्लांटसाठी परवाने देणे आणि नूतनीकरण करण्याबाबत नवीन नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार, दिल्लीच्या पूर्वीच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व महामंडळांमध्ये मांस विक्रीचा परवाना आणि नूतनीकरण शुल्क दुकानांसाठी 18 हजार रुपये आणि प्रक्रिया युनिटसाठी 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे.परवाना दिल्यानंतर, नूतनीकरण शुल्क आणि दंड दर तीन वर्षांनी 15 टक्के वाढविला जाईल.