शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यानिमित्ताने विरारच्या प्रसिद्ध जीवदानी गडावर लाखो भाविक जीवदानी माता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देविदास भवरलाल माळी (वय ४१) असं या घटनेत मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंधेरी पश्चिमेकडील डुगरे चाळ परिसरातील रहिवासी असलेले देविदास भवरलाल माळी व त्यांचे मित्र दुर्गाशंकर मनेरिया असे दोघेजण नवरात्रोत्सवानिमित्त विरार येथील जीवदानी गडावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जीवदानी गड पायऱ्यांच्या मार्गाने चढण्यास सुरुवात केली
गड चढून अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर देविदास भवरलाल माळी यांच्या छातीत अचानक दुखू लागले व त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या देविदास यांना इतर भाविकांच्या मदतीने तातडीने फर्निक्युलर ट्रेनद्वारे पायथ्याशी आणण्यात आले आणि रुग्णवाहिकेतून विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे तपासणी दरम्यान डॉक्टरांनी देविदास माळी यांना मृत घोषित केले.