आगामी 24 तासात देशाच्या विविध भागात पाऊस आपली हजेरी लावणार आहे. अनेक राज्यांमधून अनेक राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी, अनेक राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, कोकण किनारपट्टीसह कर्नाटकमध्ये आज विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहेच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने 16 ते 19 ऑक्टोबर या काळात देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी भागात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 19 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका जाणवणार आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी जाणवू लागली असली तरी दिवसा कडक उन्हामुळे उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडू शकतो, त्यामुळे कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घसरण होऊ शकते. तर, कमाल तापमान 32 अंशांपर्यंत तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. हवामान खात्यानुसार, आज, सोमवारी उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मुझफ्फराबादमध्ये हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडेल. याशिवाय अनेक राज्यांमध्ये वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.