वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाईचं रविवारी निधन झालं. आठवड्याभरापूर्वी ते अहमदाबादमधील त्यांच्या घराबाहेर संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. देसाई यांना गुजरातमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देसाईंच्या शरीरावर कुत्रा चावल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या, अशी माहिती खासगी रुग्णालयानं दिली आहे. ‘रुग्णाला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांच्या मागे कुत्रे लागले होते. त्यांच्यापासून बचाव करताना ते पडले असं आम्हाला सांगण्यात आलं. पण त्यांच्या शरीरावर कुत्रे चावल्याच्या कोणत्याही खुणा, जखमा नव्हत्या,’ अशी माहिती शेल्बी रुग्णालयानं प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. १५ ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास रुग्णाला आणण्यात आलं. त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांचं सीटी स्कॅन करुन आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर ७२ तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं, अशी माहितीदेखील रुग्णालयानं दिली आहे.