सरकारने दिलेल्या आश्वासनप्रमाणे ५० दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलने, निदर्शने झाली. चौंडीमध्ये तर २१ दिवसांचे उपोषण झाले.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे. अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही.असा अल्टिमेटम यशवंत सेनेचे प्रमुख माधवभाऊ गडदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.यावेळी उपाध्यक्ष वेंकटराव नाईक,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे,कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे,प्रवक्ते अमोल पांढरे,पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे,मुंबई जिल्हाप्रमुख सचिन व्हनमाने,नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे,ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती भंडारे आदींसह उपस्थित होते.
महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमुद केल्यानुसार धनगर आणि धनगड हे एकच जात आहे. २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्यावेळी दरवर्षी १००० कोटी निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला, १३ जीआर निघाले.पण अद्याप ठोस निर्णय पदरी पडलेला नाही. आताच्या सरकारमध्ये आश्वासक चेहरा असलेले एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातुन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याकडुन धनगर समाजाला अपेक्षा आहेत. त्यामुळे ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना विनंती करायला आलो असुन यासंबधात आवाज उठवत असल्याचे यशवंत सेनेचे माधवभाऊ गडदे यांनी सांगितले. चौंडी येथे उपोषणादरम्यान सरकारने ५० दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी. अशी आग्रही मागणी माधवभाऊ गडदे यांनी लावुन धरली आहे.आदिवासी आणि धनगर हा वाद राजकीय लोक पेटवत आहे. तुमचा आमचा वाद नाही तुम्ही तुमच्या मार्गाने आंदोलन करा आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करतोय उगाच आमच्या अंगावर येऊ नका असे गडदे यावेळी म्हणाले.
राजकिय पक्षांनी आमचा खेळ मांडु नये
धनगर समाजातील नेते विधान परिषदेच्या आमदारकीला भूलतात. २०१४ ला डॉ. विकास महात्मे आमदार झाले, त्यानंतर महादेव जानकर, राम शिंदे, गोपिचंद पडळकर आमदार झाले. राजकिय पक्षांनी धनगर समाजाची केवळ धुळफेक केली. नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. न्यायालयाला पटवुन द्यायला हवे. राजकिय पक्षांनी आमचा नुसताच खेळ मांडु नये. अशी टिकाही यशवंत सेनेच्या माधवभाऊ गडदे यांनी यावेळी केली.