शहरात २६ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १९३ रुग्ण आढळले असून शहरातील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा ७१५ वर गेल्याने नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून डेंग्यू नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्यात. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना कडक निर्देश देत प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जावून जनजागृती करा फवारणी वाढवून अजून जे जे करता येईल ते करा मात्र डेंग्यूवर आठवड्याभरात नियंत्रण मिळवा असे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी दिलेत.
मलेरिया आरोग्य अधिकारी त्र्यंबके व डॉ तानाजी चव्हाण यांच्या सोबत बैठक घेत कडक अमलबजाणीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आदि. पदाधिकारी उपस्थित होते. डेंग्यू आजाराच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने ही चिंताजनक परिस्थिती आहे. नागरिकांनी देखील आपल्या घरात परिसरात स्वच्छ्ता बाळगावी असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले आहे. आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी आढळलेल्या १०१२ मिळकतधारक, संस्था, खासगी तसेच शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत नुकतेच नोटिस देखील बजावण्यात आल्या आहेत.
नाशिककरांनी कोरडा दिवस पाळून डेंग्यूचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन देखील भुसे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना शहरात जनजागृती करणे, शहरात फवारणी करणे, डासांच्या अळ्या नष्ट करणे, प्रत्येक प्रभागात कॉलनीत जनजागृतीपर सूचना फलक लावणे, डेंग्यूचे लक्षण आणि काळजी कशी घ्यावी याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरात काही ठीकणी डपके अथवा टायर पडीक असतील त्याच्यात पाणी असल्यास त्यांचा नायनाट करण्याची सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली आहे.