आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे आयोजित पारंपरिक औषधांवरील अशा प्रकारची पहिलीच जागतिक परिषद 17-18 ऑगस्ट रोजी गुजरातमधल्या गांधीनगर येथे होणार आहे. या शिखर परिषदेमध्ये, देशाचा या क्षेत्रातील विपुल अनुभव आणि कौशल्ये विचारात घेतली जातील. तसेच हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम तज्ञ आणि अभ्यासकांसाठी या क्षेत्रातील नवीनतम वैज्ञानिक प्रगती आणि पुराव्यावर आधारित ज्ञानाचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. याचे अंतिम ध्येय सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे हेच असेल.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. जी 20 सदस्य राष्ट्रांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहा क्षेत्रांतील देशांमधील प्रतिष्ठित निमंत्रितांसह या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ, पारंपरिक औषधांचे अभ्यासक, आरोग्य कर्मचारी आणि नागरी समाजिक संस्थांचे सदस्य उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या परिषदेविषयी आयुष राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई कालूभाई यांनी नुकतीच नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.