वाहनांचा धूर, बांधकामे, फटाक्यांमुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, शहरातील सर्व बांधकामे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३२ प्रभागांमध्ये १६ वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.