ससून रुग्णालयात सध्या केवळ एक कैदी रुग्ण उरला आहे. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललिल पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. कैदी रुग्णांना तातडीने येरवडा कारागृहात पाठविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनाही उपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.
ललित पाटीलने पलायन केले, त्या वेळी ससून रुग्णालयात १६ कैदी उपचार घेत होते. पाटीलने पलायन केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर कैदी रुग्ण समितीने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सर्व कैदी रुग्णांच्या उपचारांचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह १२ कैद्यांना लगेचच कारागृहात पुन्हा पाठविण्यात आले. आता ससूनमधील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.