पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यरात्री शिवाजीनगर परिसरातील मंगला थिएटर बाहेर चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून तब्बल दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे १ च्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड (सर्वजण राहणार ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सतीश आनंदा वानखेडे (वय ३४, ताडीवाला रोड खड्डा झोपडपट्टी जनसेवा तरुण मंडळाजवळ पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन महस्के हा मंगळवारी रात्री मंगला टॉकीज या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्व वैमानस्याच्या वादातून एका टोळक्याने कोयते, तलवार आणि दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून केला. नितीनचा पूर्वी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी आरोपी सागर उर्फ येल्ल्या आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन मस्के व त्याच्या साथीदारांनी मिळून आरोपी सागर किरकोळ वादळतून मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महस्के आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला होता. मात्र, या भांडणाच्या रागातून आरोपी टोळक्याने महस्के याचा पाठलाग करून, तो चित्रपट पाहून चित्रपटगृह बाहेर आला असता, अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रने हल्ला करत त्याचा खून केला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.