महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काही दिवसांपूर्वी २५० कोटी रुपयांचे नशेचे साहित्य जप्त केले. या प्रकरणानंतर ‘डीआरआय’ने रविवारी दुसऱ्या कारवाईत तब्बल १६० कोटी रुपयांचे १०७ लिटर द्रव स्वरूपातील ‘मेफोड्रोन’ जप्त केले आहे.
काय आहे प्रकरण?
पैठणमधील एम/एस अपेक्स मेडिकेम प्रा. लिमिटेड या कंपनीत ही कारवाई करण्यात आली असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महसुल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) पुणे प्रादेशिक युनिट, पुणे प्रादेशिक युनिट, अहमदाबाद क्राइम ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात काही दिवसांपूर्वी एका केमिकल इंजिनीअर जितेश हिनोरियाच्या घरी छापा मारण्यात आला होता. याशिवाय जितेश हिनोरियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या महालक्ष्मी इंड्रस्ट्रीज, एमआयडीसी पैठण येथे छापा मारण्यात आला होता. या कारवाईत अडीचशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यात मेफोड्रोन आणि कोकेनसह केटामाइनसारख्या औषधींचा समावेश होता. या प्रकरणात हिनोरिया याने अटक केल्यानंतर स्वत:वर वार करून जखमी केले होते. ‘डीआरआय’ची टीम ही अमली पदार्थाचा शुक्रवारी (२० ऑक्टोबर) पासून पाळत ठेवून होती. या प्रकरणात आधीच जितेश हिनोरिया आणि संदीप शंकर कुमावत या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर ‘डीआरआय’ ही अमली पदार्थ तयार करण्याच्या विविध कंपन्यांचा शोध घेत होती. हिनोरिया याच्यावर कारवाई झाल्यानंतर काही दिवसांसाठी अमली पदार्थ तयार करणारे हे शांत होते. मात्र हिनोरिया प्रकरणाचा तपास करीत असताना ‘डीआरआय’च्या टीमला आणखी एका कंपनीत अंमली पदार्थाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहिती आधारे या टीमचे अॅपेक्स मेडिकेम प्रा. लि. या नावाच्या कंपनीच्या दोन कारखान्यांच्या जागेचा शोध घेतला. या पैठणमधील या कंपनीत ‘डीआरआय’च्या टीमने छापा मारला असता, या ठिकाणी सुमारे १०७ लिटर द्रव स्वरूपात मेफेड्रोन जप्त केले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य अंदाजे १६० कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’कडून देण्यात आली आहे. जप्त केलेले सर्व पदार्थ एनडीपीएस कायदा, १९८५ च्या संबंधित तरतुदींनुसार जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात अंमली पदार्थाच्या कारखान्याचा मालक आणि गोदाम व्यवस्थापकासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे सौरभ विकास गोंधळेकर (वय ४०) आणि गोदाम व्यवस्थापक शेखर पगार (वय अंदाजे ३८) अशी दोघांची नावे आहे. या दोघांना विशेष सत्र न्यायलयासमोर सोमवारी हजर करण्यात येणार असल्याची माहिती डीआयआर कडून देण्यात आली आहे.
हिनोरियासोबत लिंक
शहरात अंमली पदार्थ तयार करणाऱ्या रॅकेटमधील सूत्रधार जितेश हिनोरिया याच्या लिंकमध्ये सदर कंपनी असल्याची माहिती डीआरआयच्या सुत्रांनी दिली. या कंपनीत हिनोरिया याच्या अटकेनंतर शोधमोहीम घेण्यात आली होती. त्या वेळी हिनोरिया अटकेची बातमी येताच, सदर माल हा लपविण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश आले होते. मात्र, दुसऱ्यांदा सदर कारवाई करून गोदाम स्टॉक सर्च करित असताना, १०७ लिटर एमडी जप्त करण्यात आले आहे. अशीही माहिती सूत्रांनी दिली.