पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. अटक केल्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी आज अंधेरीतील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललितकडून करण्यात आला आहे.
ललित फरार २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली होती. अखेर मंगळवारी रात्री चेन्नई येथून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. सुनावणी वेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललितला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली. तसेच आरोपी ललितवर लावण्यात आलेले सर्व आरोप त्याच्या वकिलांनी न्यायालयात फेटाळून लावले. त्याच्या विरोधात पुरावे नसल्याचेही त्याच्या बाजूने सांगण्यात आले. मात्र, सरकारी वकिलांनी सांगितले की, हे ड्रग रॅकेट खूप मोठं आहे. यामध्ये १२ आरोपी आहे, पोलिसांनी ज्या बाराव्या आरोपीला अटक केली. त्यावेळी त्याने सांगितले की, तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुरवायचा आणि त्यानंतर ललित पाटील तो घ्यायचा. हे संपूर्ण ड्रग रॅकेट ससून रुग्णालयातून ऑपरेट केले जात होते. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बाराबाकी येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथे नऊ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. चौकशी दरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक येथे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचे समोर आले आहे.
मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं!
दरम्यान ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, असा दावा ललितने माध्यमांसमोर केला आहे. तसेच यात कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन असा इशाराही त्याने दिला आहे. ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? हे अधिक चौकशीतच स्पष्ट होईल.