येथील ऐतिहासिक तलाव फ्लेमिंगो पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. हे रुबाबदार परदेशी पाहुणे पक्षी पाहून पक्षी व निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या पक्ष्यांच्या आगमनामुळे यंदा दुष्काळ पडणार अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
आष्टी तलावातील पाण्याची पातळी कमी होते, तेव्हाच या तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. २०१३ च्या दुष्काळात या तलावातील पाणी हळूहळू कमी होत असताना, हे पक्षी मोठ्या संख्येने आले होते. यंदा तब्बल दहा वर्षांनंतर हे पक्षी आष्टी तलावात दाखल झाले आहेत. या तलावावर फेरफटका मारला असता सुमारे १०० ते १५० फ्लेमिंगो पक्षी दिसून आले. तलावातील पाणी आटल्यामुळे हे पक्षी तलावाच्या मध्यभागी जाऊन अन्नाचे भक्षण करत होते.