बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी महिलांच्या संदर्भात अतिशय अश्लिल भाषेत विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आज, बुधवारी नितीश यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हात जोडून माफी मागितली. तसेच आपले शब्द परत घेत असल्याचे सांगत खेद व्यक्त केला.
यासंदर्भात नितीश कुमार म्हणाले की, माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. लोकसंख्या नियंत्रणासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणानंतर लोकसंख्येच्या वाढीमध्ये होणारे बदल सांगणे एवढेच माझे उद्दिष्ट होते. मी माझे शब्द परत घेतो, मी जे बोललो ते चुकीचे असेल किंवा माझ्यामुळे काही दुखावले असतील तर मी माफी मागतो. माझ्या विधानावर कोणी टीका करत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यानंतरही माझ्यावर कोणी टीका केली तर मी त्याचे अभिनंदन करतो असे नितीश कुमार म्हणाले.
बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नितीश विधानसभेत पोहोचले तेव्हा भाजपचे आमदार बाहेर घोषणाबाजी करत होते. लोकसंख्या नियंत्रणाच्या वक्तव्याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर माफी मागितली. यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. भाजप आमदारांनीही आतून गदारोळ सुरू केला. राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम होते. नितीशकुमार यांनी सभागृहातही माफी मागितली. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात आपल्या खुर्च्या उचलल्या. त्यांची नावे नोंदवा, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. कारवाई केली जाईल. यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
दरम्यान नितीश कुमार यांच्या अश्लिल विधानाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, विधानसभेत त्यांनी ज्या प्रकारचे विधान केले ते सी ग्रेड चित्रपटातील संवादासारखे वाटत होते. त्यांनी विधानसभेतील सर्व महिला आणि पुरुषांसमोर हे विधान केले आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तेथे बसलेले लोक हसत होते. त्यांनी आज माफी मागितली आहे, पण नुसती माफी मागणे हा उपाय नाही. बिहारच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात पाऊल उचलले पाहिजे अशी मागणी शर्मा यांनी केली.