बिहारच्या बक्सर येथे बुधवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 6 जण ठार झाले असून सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी रेल्वे रूळ जागोजागी तुटल्याचे आढळून आले. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान या घटनेची रेल्वे बोर्डाने उच्च स्तरीय चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भातील तपास पूर्ण झाल्यावर अपघाताचे खरे कारण पुढे येण्यास मदत मिळेल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याबाबत सीपीआरओ वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोक घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहेत. अपघाताच्या कारणाबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. घटनास्थळी झोन आणि रेल्वे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी तळ ठोकून आहेत. सध्या संपूर्ण लक्ष मदत आणि बचाव कार्यावर आहे. रेल्वेचे डबे बाजूला करण्यासाठी आणि या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. जखमींवर येथील जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस बक्सरहून सुटल्यानंतर 9 मिनिटांनी ती रुळांवर घसरली. हा अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग हा ताशी 120 किमी होता. यामुळेच अपघातानंतर रेल्वेचे एक-दोन कोच वगळता जवळपास सर्व डबे अप मार्गावरील रुळांवरून घसरून पडले. सुदैवाने त्यावेळी अप मार्गावरून एकही गाडी जाण्याची वेळ नव्हती, अन्यथा बालासोरसारखी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी गार्ड आणि चालकाने सतर्कता दाखवत रेल्वे कंट्रोलरूमला रेल्वे अपघाताची माहिती दिली. यानंतर अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लांब अंतरावर रेल्वे रुळ तुटल्याचे दिसून आले. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.