भोपाळ: भाजप नेत्या पूजा दादू यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची माहिती आहे. त्या मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील खकनारच्या जिल्हाध्यक्ष होत्या. घरच्यांनी त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच आरडाओरडा सुरू केला. पूजाला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पूजा दादू या माजी आमदार राजेंद्र दादू यांच्या कन्या होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, खकनार जिल्हाध्यक्ष पूजा दादू यांनी शनिवारी रात्री उशिरा कान्हापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी पूजाला ताबडतोब बुरहानपूरच्या संजयनगर येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पूजा दादूने असे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपासात व्यस्त आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लाधवे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खकनार जिल्हाध्यक्षांनी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, अद्याप त्यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून, पुढील कारवाई पोलिस करत आहेत.
पूजा दादू या खकनार जिल्ह्याच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्यांची मोठी बहीण मंजू दादू या मंडी मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत. त्या आमदारही राहिल्या आहेत. त्यांचे वडील कै. राजेंद्र दादू नेपानगरमधून आमदार राहिले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच खांडवा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज लाधवे, माजी नगरपालिकेचे अध्यक्ष मनोज तारवाला, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गुप्ता यांच्यासह अनेक नेते घटनास्थळी पोहोचले आणि घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.