मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांवर आज, शुक्रवारी मतदान सुरू आहे. यावेळी मुरैना, छत्तरपूर, इंदोर येथे हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्यात. राज्याच्या इतर भागात शांततेत मतदान सुरू आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 27 टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.
मध्यप्रदेशातील छत्तरपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह नटी राजा यांच्या ड्रायव्हरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर मुरैना जिल्ह्यातील दिमनी विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रावर गोळीबाराची घटना घडली. दिमनी येथून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे भाजपचे उमेदवार आहेत. छतरपूर जिल्ह्यातील राजनगर येथील आमदार विक्रम सिंह नाटी राजा यांची कारने धडकून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत त्यांचा ड्रायव्हर सलमान खानचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला अरविंद पटेरिया यांनी केल्याचा आरोप विक्रम यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. तर इंदोरमध्ये काँग्रेस नेते जितू पटवारी यांचे भाऊ नाना पटवारी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली.