ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज दौंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढविला. राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चले जाओ, चले जाओ संजय राऊत चले जाओ राऊत.. एक मराठा लाख मराठा.. छत्रपती शिवाजी महाराज की..जय भवानी जय शिवाजी.. जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं..अशा जोरदार घोषणाबाजी करून संजय राऊत यांना जोरदार विरोध करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना गाव बंदीचे आवाहन केले आहे. त्यानुसार मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येण्यापासून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत दौंड येथे दौऱ्यावर आले असता. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोध दर्शविण्यात आला आहे.
दरम्यान राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी तुरुंगात असलेले कैदी बाहेर काढले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कैद्यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना राजकारणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे या गुन्हेगारांचा निवडणुकीत दडपशाहीसाठी वापर करणार. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या नेत्यांचे एक पथक नेमले असून गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्याचे काम सरकार करत आहे. तसेच कोणता पोलीस अधिकारी जामिनावर सुटून सरकारसाठी काम करत आहे याची माहिती ही लवकरच उघड करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
उद्या दौंडचे आमदार जेलमध्ये असू शकतात..
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आज संजय सिंग जेलमध्ये आहेत. उद्या दौंडचे आमदार जेलमध्ये असू शकतात. मोदींनी त्यांच्यावर आरोप केले ते आज मंत्रिमंडळात आहेत. 2024 नंतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आज जे भाजपमध्ये गेले आहेत ते 2024 ला आमच्या दारात उभे राहतील तसेच 24 ला नरेंद्र मोदी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिका जिंकून दाखवावी..
सध्या ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना आवडलं नाही. असं म्हणत सरकारने पालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. मोदींनी प्रचाराला यावे एक महिना राहावे आणि मुंबई महापालिका जिंकून दाखवावी. असे आवाहनही राऊत यांनी केले.
भाजपने 12 गावचे लफंगे घेऊन पक्ष स्थापन केला
भाजपने 12 गावचे लफंगे घेऊन पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्याकडे स्वतःचे असे काय आहे. बारामतीत भाजपचा स्वतःचा उमेदवार कोण आहे. शुद्ध आणि हिंदुत्ववादी उमेदवार आहे का.. कोणी असे म्हणत बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.