येथील दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या इंधनाच्या पाईप ढिला झाल्यामुळे मोठा स्फोट झाला. यात १० लहान मुलांसह एकूण १५ जण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर सातारा, काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
महाबळेश्वर येथील कोळी आळीमधील दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना जनरेटरच्या पेट्रोल पाइपमध्ये गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील १० मुले आणि अन्य काही भाविक भाजल्याची माहिती समोर येत आहे. मुलांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने मुले भाजली आहेत. सर्व जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सर्व जखमी मुलांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात, तर काही मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील दसऱ्याचे कार्यक्रम सोडून साताऱ्यातील रुग्णालयात धाव घेतली. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीही या घटनेची माहिती मिळताच सातारा येथील रुग्णालयाशी संपर्क साधला. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचप्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. माजी नगरसेवक संतोष शिंदे हे जखमी मुलांसोबत आहेत. काही मुले जास्त भाजल्याने आमदार मकरंद पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.