राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील जनरल मोटर्सच्या कामगारांची भेट घेतली. नव्या कंपनीनं कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या भेटीसाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणाचा आहे शेंबड्या पोराला विचारलं तरी तो पक्ष शरद पवारांचा आहे, असं उत्तर देईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं वेगळा निर्णय दिला तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय द्या, जयंत पाटील यांची मागणी
जनरल मोटर्स कंपनी ह्युंदाई कंपनी विकत घेणार आहे. एक कंपनी जात आहे दुसरी येत आहे हे ठीक आहे पण, कामगारांना क्लोजरच्या नोटीसा देणं चुकीचं आहे. राज्याचे मंत्री, कामगार मंत्री, कामगार विभागाचे अधिकारी डोळे झाकून बसले आहेत. हजार कुटुंबाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारच्यावतीनं या कामगारांना भेटण्यास कुणी आलेलं नाही. आम्ही याचा निषेध करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कामगारांच्या पाठिशी आहोत. तळेगाव परिसरातील कामगार विश्वात खळबळ उडाली आहे.
हा जनरल मोटर्सचा विषय राहिलेला नाही, तळेगाव, चाकण इथल्या कामगारांचा प्रश्न झाला आहे. हजारो कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही विधानसभेत हा प्रश्न मांडणार आहोत, असं जयंत पाटील म्हणाले. राज्य सरकारनं जनरल मोटर्सच्या कामगारांना आहेत त्या नियम अटींवर कामावर ह्युंदाई कंपनीनं घ्यावं, असं जयंत पाटील म्हणाले.
जनरल मोटर्सनं कंपनी विकली आहे, दुसरी कंपनी येऊन चालवणार आहे. सध्याच्या कामगारांना कामावरुन काढून नव्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीनं घेऊन काम करणं चुकीचं आहे. हजारो कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील तरुण या सरकारवर नाराज आहेत. सरकारची नीती ही कंत्राटी पद्धतीनं काम करुन घेऊ, युवकांना सरकारी नोकरी देणार नाही अशी शपथ घेत सरकार सत्तेवर आलंय का असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
मावळच्या आमदारांनी एमआयडीसी बंद करण्याऐवजी ते सत्तेजवळ गेलेले आहेत. तिथं जाऊन चुकीचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांना चार शब्द सुनावण्याची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले.