भारतीय बहुराष्ट्रीय उद्योगसमूह लार्सन अँड टुब्रोने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून, मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम पार्कला मुंबईतील पहिले दिव्यांग-स्नेही मनोरंजन पार्क बनवण्यात मदत केली आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मालकीचे हे पार्क ५.५ हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वसवण्यात आले असून २०१८ सालापासून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले आहे.
लार्सन अँड टुब्रोने आपले एनजीओ सहयोगी ”प्रोजेक्ट मुंबई” आणि एमसीजीएम यांच्या सहयोगाने पार्कमध्ये आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या ठिकाणी तसेच पार्कमध्ये विविध ठिकाणी रॅम्प्स बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवून या पार्कचे रूपांतर मुंबईतील पहिल्या इन्क्लुसिव्ह पार्कमध्ये केले आहे. त्यामुळे आता व्हीलचेअरवरून ये-जा करावी लागणाऱ्या व्यक्तींना देखील या पार्कचा आनंद घेता येईल.
लार्सन अँड टुब्रोने पार्कमधील लहान मुलांसाठीची खेळण्याची जागा सर्वसमावेशक सुविधा बनवण्यात देखील मदत केली आहे, त्यामुळे आता विशेष सक्षम मुलांसह सर्व मुले याठिकाणी खेळू शकतील. विशेष गरजा ध्यानात घेऊन कंपनीने उपकरणे उभारली आहेत तसेच जवळपास ४००० चौरस फीटचे रबर मॅटिंग करून पृष्ठभागाचे रीकारपेंटिंग केले आहे. यामुळे कुशनिंग व शॉक ऍबसॉरप्शनचे लाभ मिळतात, एखादे मूल पडले तरी जखमा वगैरे होत नाहीत. त्यामुळे ही जागा मुलांसाठी, खास करून दिव्यांग मुलांसाठी खेळण्यासाठी अधिक जास्त सुरक्षित बनली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कौशल्ये, रोजगार, उद्यमशीलता आणि नावीन्य विभागाचे माननीय मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी लार्सन अँड टुब्रोच्या आर्थिक मदतीने विनानफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या प्रयास ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती मीना सुब्रमण्यन यांच्यासह नवीन सुविधांचे उदघाटन केले.
प्रयास ट्रस्टमध्ये लार्सन अँड टुब्रो कर्मचाऱ्यांच्या पत्नी व कंपनीच्या महिला कर्मचारी एकत्र येऊन वंचित समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करतात. त्यांच्या कामामध्ये आरोग्य देखभाल, मुलांची देखभाल, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पाणी व स्वच्छता या पाच क्षेत्रांवर विशेष भर दिला जातो.