शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेले काही कार्यकर्ते माघारी जात असतांना त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. काही जण गंभीर आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने बस पलटी झाली. जोरदार धडकला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बस देखील एकमेकांवर धडकल्या. या भीषण अपघातात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळला. इतर दोन बसचंही या अपघातात मोठे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर काचांचा मोठा खच पडला होता.