देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकतात. मात्र, याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानतर एकच खळबळ उडाली आहे. साई भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची बनावट पावती देत असल्याची तक्रार करण्यात आली होती. साईबाबा संस्थांनने याबाबत चौकशी केली असता सदर प्रकरणी असा प्रकार झाल्याचा समोर आला. देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत समोर आल्यानंतर साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक एस. पी. शिरसाठ यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी आरोपीला अजून कोणाची साथ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याचबरोबर आत्तापर्यंत किती लोकांना अशा पद्धतीने बनावट पावत्या देण्यात आला याचा तपास सुद्धा आता पोलीस करणार आहेत. साईबाबांच्या झोळीत साईभक्त श्रद्धेने दान करतात. त्यामुळे साईभक्त व साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे. आता पोलीस आणि प्रशासन याबाबत आगामी काळात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.