उत्तरप्रदेशातील मथुरा इथल्या श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधीत 16 याचिकांवर अलाहबाद उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झालीय. न्या. मयंककुमार जैन यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय राखून ठेवलाय.
याप्रकरणी अधिवक्ता आयुक्तांमार्फत परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश द्यायचा की 1991 च्या धार्मिक स्थळ कायद्यांतर्गत खटल्याची सुनावणी आधी करायची हे न्यायालयाला ठरवायचे आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार, उच्च न्यायालय एकाच वेळी मथुरा जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या 16 याचिकांवर सुनावणी करत आहे. या याचिकांत शाही ईदगाह मशीद, यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ व श्रीकृष्ण जन्मभूमी संघ हे पक्षकार आहेत. याबाबत अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले की, श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयुक्तांनी दाखल केलेल्या अर्जावर हायकोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे.