स्वतःत दडलेल्या अफाट साधनसंपत्तीमुळे, समुद्र म्हणजे जागतिक स्पर्धेसाठी उदयास येत असलेली नवीन आघाडी आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या साधनसंपत्तीवर आपापला हक्क दाखवण्याच्या स्पर्धेतून निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य तंट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, परिणामकारक नियमन व्यवस्था आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधोरेखित केले.
नवी दिल्लीत आयोजित, हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवाद-2023 मध्ये बोलत होते. जगातील वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था असल्यामुळे, खुल्या आणि मुक्त, कायदेशीर अधिकृत व्यापाराने परिपूर्ण असलेले, नियमाधारित आणि शांततापूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्र भारताला हवे आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले.
भारत म्हणजे,जागतिक शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारी आघाडी म्हणून उदयास येत असलेली अर्थव्यवस्था, असे वर्णन करत उपराष्ट्रपतींनी, जागतिक सुव्यवस्था राखण्यासाठी जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीने, भारताने महत्त्वपूर्ण आणि विधायक भूमिका बजावायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
इतर सर्व राष्ट्रे एकत्र आली तरच एखाद्या बलाढ्य राष्ट्राची हाव आटोक्यात राहू शकते हे अधोरेखित करून धनखड म्हणाले की सहयोगात्मक सुरक्षा आणि नवोन्मेषी भागीदारी हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. “हाच एकमेव मार्ग आहे. कोणताही देश एकटा उभा राहू शकत नाही, त्यासाठी एकत्रितपणे कृती करावी लागेल,” असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
जागतिक लोकसंख्येचा एक षष्ठांश भाग असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले नाही आणि त्यामुळे या जागतिक संघटनेची कार्यक्षमता नक्कीच घटते अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आपली वेदना आणि व्यथा देखील व्यक्त केली. महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हिंद-प्रशांत क्षेत्रामधील व्यापार आणि संपर्क व्यवस्थेची सुरळीत देखभाल विस्कटू शकेल अशा टांगती तलवार असलेल्या अनेक परिस्थितींसह जागतिक स्फोटक परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागत आहे,असे निरीक्षणही त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना नोंदवले.
कितीही आधुनिक प्रगती झाली तरी नकली निर्मिती-चाचेगिरी(पायरसी) आणि अंमली पदार्थांची तस्करी हे अजूनही आपल्यासमोरील एक मोठे आव्हान आहे असे नमूद करत धनखड यांनी हे लक्षात आणून दिले की या अवैध धंद्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा वापर, राजकीय पाठबळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समाजविघातक शक्तींकडून शांतता आणि सौहार्द बिघडवण्यासाठी होत असतो. “जागतिक शांततेच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारे सर्वात मोठे विध्वंसक म्हणून या राजकीय पाठबळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समाजविघातक शक्ती उदयास आल्या आहेत. त्यांना निष्क्रीय करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न पुरेसे ठरु शकणार नाहीत. केवळ एकजुटीने, तसेच खंबीर आणि निर्णायक यंत्रणे द्वारेच, त्यांचा सामना करता येऊ शकतो”, असे मतही उपराष्ट्रपतींनी नोंदवले.