संपूर्ण ऑगस्ट महिना ढगांकडे बघायला लावून सप्टेंबर महिन्यात जेमतेम पडलेला पाऊस ऑक्टोबर महिन्यात मात्र चांगला पडत आहे. सलग दोन दिवस पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे.जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या दोन दिवसांत ३७.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच मंडळात पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर मंडळात तब्बल १२९ मि.मी. नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवातही कोरडीच झाली होती. सप्टेंबर अखेरला मात्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना ऑक्टोबर महिन्यात सलग दोन दिवस पाऊस पडतो आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण ३.३ मि.मी. तर रविवारी रात्री ३४ मि.मी. असा दोन दिवसांत ३७.३ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.