सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर डिसेंबरमध्ये २८ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी सामने खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तशी ग्वाही दिली आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूर शहरातील पार्क स्टेडिअमवर आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील काही सामने सोलापुरात होणार आहेत. पार्क स्टेडिअमवर जवळपास २२ ते २५ हजार प्रेक्षक बसू शकतात.खेळाडूंची ड्रेसिंग रुम, सरावासाठी खेळपट्टी मुबलक असून मुख्य सामन्यांसाठी खेळपट्ट्या देखील उत्तम आहेत. काही दिवसांपूर्वी रणजी निवड चाचणीसाठी सामने या मैदानावर पार पडले. त्यावेळी रणजीचे २८ तर २३ वर्षांखालील संघाचे ३३ खेळाडू आणि सर्व संघाचे प्रशिक्षक सोलापुरात आले होते. त्यांना मैदानाबरोबरच मैदानावरील सोयी- सुविधा आणि सोलापुरातील राहण्याची सोय, जेवण खूपच आवडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.