शहरात होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून तिघा चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दागिने, मोबाईल आणि बाईक चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले.पेट्रोलिंगद्वारे चोरट्यांचा शोध घेताना सपोनि संदीप पाटील यांच्या पथकाला रेकार्डवरील सध्या तडीपार असलेला आरोपी अशोक चौकात येणार असल्याची टीप मिळाली. त्यानुसार सापळा लावून संदीप चव्हाण (वय- ३८, रा. मुळेगाव, पारधी कॅम्प सोलापूर) दुचाकवरुन जाताना शांती चौक पाण्याच्या टाकीजवळ पकडले.
त्याच्याकडून घरफोडीतील सोन्याचे दागिने, चांदीचा गणपती, गॅस टाक्या, इलेक्ट्रिक मोटार, प्लॅस्टिक पाण्याची टाकी आणि १५०० रोख रक्कम असा ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चोऱ्या त्याने एमआयडीसी व सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे कबूल केले.संदीप पाटील यांच्याच पथकाने आणखी दोन मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. कमी किंमतीत मोबाईल विकणाऱ्या सिद्धाराम नागप्पा हावनूरकर (वय ३०, मंत्री चंडक नगर, सोलापूर) याला अक्कलकोट नाका स्मशानभूमी येथे पकडले. त्याने फौजदाचार चावडी व विजापूर नाका हद्दीत ३५ हजार रुपयांचे दोन मोबाईल चोरल्याचे कबूल केले.