उजनी धरणाची कासव गतीने साठीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या धरण ५८ टक्क्यांवर पोहोचले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने मागील चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतल्याने वरील धरणातून येणाऱ्या विसर्गमध्येही घट झाली आहे.
दौंड येथून गुरुवारी सायंकाळी ९३१८ क्यूसेकने विसर्ग उजनीच्या दिशेने येत होता. त्यामध्ये घट होऊन तो ७३३१ क्यूसेक झाला तर सायंकाळी त्यामध्ये आणखी घट होऊन तो सध्या ६४८५ क्यूसेकने झाला आहे. धरणाच्या यशवंतसागर जलाशयातील एकूण जलसाठा ९५ टीएमसी झाला आहे, तर उपयुक्त साठा ३१ टीएमसी एवढा झाला आहे.
दरम्यान सध्या शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.सोलापूर शहराची तहान उजनी धरणच भागविते. धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीमार्गे सोडलेले पाणी दोन दिवसांपूर्वी औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचले. त्यामुळे किमान दोन महिन्यांची सोलापूरची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.