जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा व बार्शी या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असून त्याअनुषंगाने सर्व बॅंकांना पत्र पाठविण्यात आले आहे. सक्तीची कर्ज वसुलीही करू नका, अशा सूचना अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी बॅंकांना दिल्या आहेत.
राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच सवलतीच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा अग्रणी बॅंकेच्या माध्यमातून सक्तीची कर्जवसुली करू नये, पाच तालुक्यातील शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, असे सर्व बॅंकांना कळविण्यात आले आहे. मागील खरीप हंगामात पीक कर्ज घेतलेल्या रकमेचे पुनर्गठन केले जाणार आहे. बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.