जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती आला असून त्यात भाजपने सर्वाधिक ४९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने १५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १० ग्रामपंचायतींवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पिछाडीवर राहिल्याचे दावे अन्य पक्षांनी केले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील १४, बार्शीतील तीन, करमाळा, माढा व मोहोळ तालुक्यातील प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्यातील सात, मंगळवेढ्यातील १४, दक्षिण सोलापुरातहल सहा, पंढरपूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर भाजपने बाजी मारली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने करमाळा व माढ्यातील प्रत्येकी सहा, माळशिरस तालुक्यातील दोन, पंढरपुरातील एक ग्रामपंचायत काबिज केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला करमाळ्यात सात, माढ्यात दोन, सांगोल्यात एका ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यात यश मिळाले.