दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचं पिल्लू आढळल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मगरीचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेतलं असलं तरी स्विमिंग पूलमध्ये कुठून आलं, याची भीतीयुक्त चर्चा सर्वत्र रंगली होती. जवळच असलेल्या बेकायदा प्राणिसंग्रहालयातून ते आल्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे, परंतु मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्राणी तस्करीचा अड्डा सुरु असल्याचा आरोप केला आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक्सवर सीसीटीव्ही फूटेज शेअर करत हा आरोप केला आहे. “हा घ्या पुरावा. मगर ही बाजूच्या प्राणी संग्रालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करीचा अड्डा आहे” असा दावा संदीप देशपांडेंनी केला आहे.
प्राणीसंग्रहालयातून ही मगर आल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता प्राणी संग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
स्विमिंग पूलमध्ये सकाळी अनेक जण पोहण्यासाठी येत असतात, त्यापूर्वीच ही मगर स्विमिंग पूलमध्ये दिसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु जलतरण सरावाला येणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून कारवाईची मागणी केली जात आहे.