मुंबई, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : ‘एक है तो सेफ है’ याचा वेगळा अर्थ काढू नका. हा नारा सकारात्मक आहे. धारावीकरांना पक्कं घर मिळू नये, ही राहुल गांधी यांची इच्छा आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना राहुल गांधी यांनी आणलं. अदानी यांचा उदय खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळातच झाला आहे. काँग्रेस आणि अदानींचे नाते जुने आहे. तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींसोबतचा फोटो दाखवत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अदानींचे असेच फोटो रॉबर्ट वड्रा यांच्यासह काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक गेहलोत, भुपेंद्र हुड्डा तसेच शशी थरूरांसारख्या अनेक काँग्रेस नेत्यांसोबतही आहेत. हे फोटो राहुल गांधी यांना दिसले नाहीत का?, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उपस्थित केला.
मुंबईत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी – अदानी यांच्यातील संबंधांविषयी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने तावडे यांनी पत्रकार परिषद घेत गांधी यांचे आरोप खोडून काढले.
तावडे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता ही वास्तविकतेवर चर्चा करणारी आहे. फेक गोष्टींवर मराठीजन विश्वास ठेवत नाहीत. फोटो झळकविण्याच्या या प्रकारामुळे ‘एक है तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है’, हे सिद्ध झाल्याचा दावा तावडे यांनी केला. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील जमीन राज्य सरकारकडेच राहणार आहे. अदानीला ही जमीन जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ही टेंडर प्रक्रिया झालेली आहे. तेव्हाच्या निविदा प्रक्रियेत अदानी आणि अबुधाबी येथील एका शेखच्या सेकलिंक कंपनीने निविदा भरल्या होत्या. त्या शेखला कंत्राट मिळाले नाही. याचे दु:ख राहुल गांधी यांना झाल्याचे म्हणायचे का? असा प्रश्नही तावडे यांनी केला.
धारावीत राहणाऱ्या सर्वांना घरे मिळणार आहेत. पहिल्या मजल्यावरील लोकांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. स्थानिकांना पाचशे चौरस फुटापर्यंतची घरे तसेच उद्योगांसाठीही जागा दिली जात आहे. या प्रकल्पात कोणती गोष्ट झोपडीधारकांच्या विरोधात आहे, हे राहुल गांधी सांगू शकले नाही. उलट, धारावीकरांनी झोपडपट्टीतच राहावे, अशी त्यांची इच्छा आहे का, असेही तावडे म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याचा राहुल गांधी यांचा दावाही तावडे यांनी फेटाळून लावला. एअर बस, फॉक्सकॉन असे उद्योग हे महाविकास आघाडीच्या काळातच अन्य राज्यात गेले. महायुतीच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेला नाही. यासंदर्भात राहुल गांधी यांनी जाहीर चर्चेला यावे, असे आव्हानही तावडे यांनी दिले.