अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील दूधनी नगर पालिका नगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून प्रथमेश म्हेत्रे आणि शांभवी म्हेत्रे या बहीण भावाने उमेदवार अर्ज दाखल केले असून नगरसेवकपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. याशिवाय अक्कलकोट व मैंदर्गी येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाहीत.
अक्कलकोट मैंदर्गी दूधनी नगर पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु अर्ज दाखल करण्याची पद्धत ऑनलाइन असल्याने ते दिसून येत नाही. अनेक इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धत असावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ऑनलाइन भरण्यासाठी गेल्यानंतर सव्र्व्हर डाऊन, वीज जाणे असे प्रकार सायबर कॅफेमध्ये दिसून येत आहेत. तसेच तेथे छोटी जागा असल्याने बराच काळ ताटकळत थांबावे लागते. या समस्या असल्याने ऑफलाइन पद्धत चांगली असल्याचे मत अनेक इच्छुकांनी व्यक्त केले.
नामनिर्देशन ऑनलाइन पद्धतीने भरून पीठासन अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवाराला दोन सूचक तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक असणे आवश्यक आहेत. राखीव गटासाठी पाचशे रुपये तर सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये इतकी अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. उमेदवारांनी शौचालय वापराचा दाखला, घरगुती कर, वीज बिल, पाणीपट्टी, टेलिफोन बिल इत्यादी करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, अशी अटही नमूद करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी नगरपालिका सभागृहात प्रभागनिहाय अर्जाची छाननी होईल तर २१ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन माघार घेण्याची शेवटची तारीख राहील. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार असून २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडेल. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.




















