वळसंग – सोलापूर–अक्कलकोट रोड परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना व नियोजन माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मा. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, अक्कलकोट विभागाचे डी.वाय.एस.पी.विलास यामावर तसेच जी.आर. अक्कलकोट–सोलापूर हायवे प्रा. लि. चे श्री. मणी भूषण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
वळसंग पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, जी.आर.आय.एल टीम तसेच स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.
या उपक्रमांतर्गत सोलापूर – अक्कलकोट रोडच्या दोन्ही बाजूंना वड, पिंपळ, भोकर, नीम तसेच इतर पर्यावरणपूरक रोपांची लागवड करण्यात आली. वाढत्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम रस्त्यालगत हरितपट्टा निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारीवर्ग आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी मानले.




















