महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी २ ऑक्टोबर रोजी I.N.D.I.A. आघाडीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत ‘मी पण गांधी’चा नारा दिला जाणार आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही पदयात्रा २ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता मेट्रो सिनेमा, हुतात्मा चौक ते रिगल सिनेमा येथून मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत जाईल. या माध्यमातून गांधीजींचे प्रेम, सद्भावना, शांतता हे विचार जनमानसात पोहोचविले जाणार आहेत. त्याचबरोबर ‘फोडा आणि राज्य करा’ या इंग्रजांच्या नीतीचे राजकारण करणाऱ्या भाजपचा निषेध केला जाणार आहे.
गायकवाड पुढे म्हणाल्या की, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत बेकायदा कब्जा करून कार्यालय थाटले. विधानसभेत आम्ही आवाज उठवला; मात्र, आता रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशाराही दिला.
या वेळी I.N.D.I.A. आघाडीतील घटक पक्षांचे मुंबईतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यात समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण आणि मुंबई अध्यक्षा राखी जाधव, आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, महाराष्ट्र डीएमकेचे ए. मीरन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे, शेकापच्या सम्या कोरडे, जदयुचे अध्यक्ष अमित झा, राजदचे मोहम्मद इक्बाल आदी नेते उपस्थित होते.