सोलापूर – शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तसे पत्र काढले आहे. सुधीर खरटमल यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पुढील शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तशी बैठक देखील सोलापूरचे प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली होती. या बैठकीत शहराध्यक्षपदी कोणाची नेमणूक करावी, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. त्या बैठकीत सर्वानुमते महेश गादेकर यांच्या नावाला होकार दर्शवण्यात आला होता. त्यानुसार रविवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.
दरम्यान, महेश गादेकर यांनी महाविद्यालयीन जीवनापासून समाजकारण आणि राजकारणास सुरुवात केली. १९९२ रोजी त्यांच्या पक्षीय राजकारणास सुरुवात झाली. सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या कामाच्या जोरावर १९९६ रोजी ते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९७ रोजी महापालिका निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन निवडून आणले. १९९७ रोजी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१० रोजी त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पक्षाने दिली. २०१२ रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त १७ नगरसेवक निवडून आणले. २०१४ मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली होती.
आता त्यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. खा.शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला. याकार्यक्रमास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सोलापूर शहराध्यक्ष असताना त्यांनी फिरता दवाखाना ही संकल्पना सलग पाच वर्षे राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.
आगामी महापालिका असणार लक्ष
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामकाज करण्यात येणार आहे. पक्ष बांधणी तसेच उमेदवारांची निश्चिती करण्यात येऊन संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवू.
– महेश गादेकर, शहराध्यक्ष
क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे योगदान
महेश गादेकर हे राजकारणाबरोबर क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील मनाच्या सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे उपाध्यक्ष सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. सोलापूर शहर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष, सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महेश गादेकर यांनी २०१५ रोजी सोलापूर शहरात खो खो ची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रथमच घेतली.




















