मुंबई, १८ नोव्हेंबर (हिं.स.) : मोदींची घोषणा ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ ही हैं’ असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) सादर करून पत्रकारांसमोर ती उघडली. त्यात मोदी आणि अंबानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोपही तिजोरी दाखवत राहुल गांधी यानी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी यांना नरेंद्र मोदी यांचा फुल सपोर्ट आहे. हेच नाही तर नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे खूप जुने संबंध आहेत. फक्त विषय धारावीचाच नाही तर अनेक जमिनी नरेंद्र मोदी यांनी अदानी यांना दिल्या आहेत. राज्य सरकारमुळे 5 लाख युवकांचा रोजगार गेला, असे विविध आरोप त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी तिजोरीमधून दोन पोस्टर काढली. यामधील एका पोस्टरवर नरेंद्र मोदी आणि अदानी हे दोघे दिसले. राहुल गांधी यांनी काढलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये मुंबईची धारावी दिसली. यासोबतच राहुल गांधी यांनी म्हटले की, धारावी आणि सर्व विमानतळे अदानी यांना दिली आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली आहे.
मुंबईतील धारावी ही लघु व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करुन धारावी अदानीच्या घशात घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावीच्या जमिनीपुरताच मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधीत आहे. देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम, बंदरे, उर्जा निर्मीती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. भाजपाची नजर मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.