“महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही”, अशी टीका आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आली होती.
महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही. हा प्रयोग केला नसता तर शरद पवार सक्रीय राजकारणापासून दूर सारले गेले असते. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली” अशी टीका लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएसच्या मुखपत्रातून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे
पुण्यात पक्षाची बैठक झाल्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संघाच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मला त्याबाबत काहीही बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांचे लोक आपली मतं मांडत असतात. निवडणूक काय घडलं, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर मला कोणतीही टीका-टिपण्णी करायची नाही. मी विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. आपल्या जिल्ह्याला, राज्याला कशी मदत होईल, महत्वाची कामे कशी मार्गी लागतील, याकडे मी लक्ष केंद्रीत केलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
आरएसएसने काय म्हटलं होतं?
(ऑर्गनायजर, लेखक- रतन शारदा, यांनी लिहिलेल्या लेखातील मुद्दे)
2024 लोकसभेचा निकाल हा अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी रियालिटी चेक आहे. सोशल मीडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर केल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी थेट मैदानावर उतरुन मेहनत घ्यावी लागते. मोदींच्या नावावर निवडून येवू या भ्रमात सगळे होते, रस्त्यावर जनतेच्या मनात काय आहे याचा कानोसा घेतलाच नाही. संघाने भाजपचं काम केलं नाही या आरोपात तथ्य नाही. 1973 ते 1977 हा आणीबाणीचा काळ सोडला तर संघाने कधीच प्रत्यक्ष राजकारणात थेट भाग घेतला नाही. 2014 ला संघाने शतप्रतिशत मतदानासाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी संघाने राष्ट्र बांधणी, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विचारांना पाठिंबा मिळावा, लोकांनी मतदानाला बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले.