श्रीपूर – आजच्या म्हणजेच कलियुगाचा विचार केल्यास श्रवण भक्ति श्रेष्ठ मानली आहे . भवतापा पासून मुक्ती मिळण्यासाठी भागवत कथा महत्वाची आहे म्हणून तिचे श्रवणास महत्व आहे . असे प्रतिपादन श्रीमद्भागवत कथाकार गोपाल महाराज कारखेलकर यांनी केले .
श्रीपूर येथिल चंद्रशेखर विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाचे आयोजन प्रसंगी प्रथम पुष्प गुंफताना ते निरूपण प्रसंगी बोलत होते .
सुरुवातीस कारखेलकर महाराज यांनी या ठीकाणी भागवत कथेस दहा वर्ष पूर्ण झाली आहेत . संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व अन्य साधू संताच्या पालख्या या मार्गावरून जातात परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान लाभलेला हा भाग म्हणूनच कोरोना सारख्या महामारीतही या ठीकाणी भागवत सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले हे मोठे भाग्य असल्याचे सांगितले .
पुढे बोलताना ते म्हणाले की , भगवंताला काय प्रिय आहे हे आपल्या थोर साधू संतानी आपणांस सांगितले आहे त्या प्रमाणे भाव व लक्ष एकत्र होणे म्हणजेच भक्ति होय . मनाला कामादी विकारापासून आवरणे , विषयाच्या चिंतनातून मुक्ती देणे , साधूंचा संग , श्रीमद भागवत कथेचे श्रवण , व भगवंताचे नाम घेणे , कठोर वचनांचा त्याग , पूर्वग्रह दुषीतता , वस्तू व संप्पत्तीचा अधिक संग्रह न करणे म्हणजेच भक्ति होय . यातूनच जीवन समाधानी होते असे सांगितले .
महाळुंग – श्रीपूर पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सज्जन जाधव व मित्र मंडळाच्या वतीने बुधवार दि . ५ नोव्हें . (त्रिपुरारी पोर्णिमा ) ते मंगळवार दि . ११ नोव्हें . २०२५ असे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे
सोहळा पार पाडण्यासाठी अनिल जाधव ,अनिल मुंडफणे अजित पोखरे , भानूदास पिसाळ , राजकुमार काळेल , उद्योजक संदीप सुरेश घाडगे , नितीन जाधव , सतीश लांडगे , नितीन मिस्कर , सुरेश पवार ,प्रशांत घाडगे , दादा पवार , प्रितम मांडवे परिश्रम घेत आहेत .






















